लोकल ट्रेन अथवा प्रवास बंदीचा विचार नाही

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा खुलासा
लोकल ट्रेन अथवा प्रवास बंदीचा विचार नाही

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईत करोना corona रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही मुंबईतील लोकल ट्रेन Local Train अथवा जिल्हा अंतर्गत प्रवास बंदी घालण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे Public Health Minister Rajesh Tope यांनी गुरुवारी केला.

राज्यात बुधवारी करोनाचे २५ हजार रुग्ण सापडले. त्यात मुंबईतील १५ हजार रुग्णांचा समावेश आहे. पॉझीटिव्हीटी रेट २५ टक्के आहे. पण रुग्ण संख्येत वाढ होत असली तरीही रुग्णालयातील खाटा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. राज्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही. या सर्व बाबी जमेच्या आहेत, असा दिलासाही त्यांनी दिला.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या समवेत राजेश टोपे आणि आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. सध्या कोरोना रुग्णांना फुफ्फुसापर्यंत संसर्ग पोहोचत नाही. संसर्ग केवळ घशापर्यंत मर्यादित आहे.घसा, नाकापर्यंत लक्षणे आढळतात. घशात खवखव, सर्दी होणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे टोपे म्हणाले.

काल, बुधवारी २५ हजार रुग्ण सापडले. उद्या कदाचित ३५ हजार रुग्ण असू शकतील. त्यामुळे शरद पवार यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. सध्या घातलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी काही अधिक निर्बंध वाढवायची गरज भासली तर तेही वाढवावेत, अशी सूचना पवार यांनी केल्याचे टोपे म्हणाले.

मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा, महाविद्यालये बंद केली आहेत. मात्र, त्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी मॉल, रेस्टाँरंटमध्ये गर्दी करू लागले तर उद्देश साध्य होणार नाही, याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. बैठकीत लसीकरण, औषध, निर्बंधांवर चर्चा झाली. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कठोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे दररोज सकाळी सात वाजता फोनवर बोलतात. करोना परिस्थितीवर एकमेकांशी अतिशय सविस्तर चर्चा करतात. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी या नेत्यांना सोपे होऊ शकते, म्हणून शरद पवार यांनी या बैठकीत अधिकची माहिती घेतली. निर्बधांच्या संदर्भात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठक घेतली. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि शरद पवार हे एकत्र चर्चा करून निर्णय घेतील. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करता येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

या बैठकीत प्रामुख्याने झालेल्या चर्चेत लसीकरणाचा वेग वाढवण्यावर एकमत झाले. अजूनही ७० ते ८० लाख लोकांनी एकही लस घेतलेली नाही. त्यांनी लस घेतलीच पाहिजे. एक लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसीची तारीख उलटून गेल्यावरही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. फ्रंटलाईन, आरोग्य कर्मचारी, सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार असून त्यावरही चर्चा झाली असून खुद्द शरद पवारही तिसरा डोस घेतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.

रात्रीची संचारबंदी किंवा वीकएंड लॉकडाऊनच्या संदर्भात विचारले असता, या सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com