मुंबईतील दोन रुग्णालयांसाठी नव्याने स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबईतील दोन रुग्णालयांसाठी नव्याने स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

मुंबई । प्रतिनिधी

मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल अर्थात जीटी या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी दिले.

अमित देशमुख यांनी आज सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली. त्यावेळी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयासोबतच नवीन नर्सिंग कॉलेजचा प्रस्तावही सादर करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

सेंट जॉर्ज रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येतात हे लक्षात घेता या रुग्णालयासाठी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा. रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक खाटांची संख्या वाढविण्यात यावी. रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्रही तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश देशमुख यांनी दिले.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे रूपांतर सध्या कोरोना रुग्णालयात करण्यात आले असून क्रिटिकल केअर युनिट म्हणून हे रुग्णालय उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहे. असे असले तरीही या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय स्तरावरील बरे होणाऱ्या रुग्णांच्या सरासरी पेक्षा कमी असू नये याची दक्षता घेण्याची सूचना अमित देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com