पोलिस विभाग अधिक तत्परतेने सेवा करेल

शहर पोलिसांसाठी नवीन वाहनांचे लोकार्पण
पोलिस विभाग अधिक तत्परतेने सेवा करेल

औरंगाबाद - Aurangabad :

नवीन वाहनांचा शहर पोलिसांच्या ताफ्यात समावेश झाल्याने पोलीस विभागातील कामे अधिक गतीने होईल. तसेच नागरिकांनाही अधिक तत्परतेने सेवा देणे शक्य होईल, असे पालकमंत्री देसाई म्हणाले.

डायल -112 प्रकल्पकरिता जिल्हा नियोजन समितीच्या (डिपीसी) माध्यमातून शहर पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शहर पोलिसांसाठीच्या नवीन बारा चारचाकी वाहनांचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात झालेल्या लोकार्पण सोहळ्यास आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील (परिमंडळ 1) मीना मकवाना, दिपक गिऱ्हे (परिमंडळ 2 )पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे, पोलीस निरीक्षक मोटार परिवहन शाखा अनिल घाडगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी देसाई म्हणाले की, शासन पोलिसांच्या विविध समस्या, अडचणी सोडवणे आणि पोलिस विभाग अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिसांसाठी घरे, वाहने, शस्त्रे याबाबत पोलीस विभाग परिपूर्ण होण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे पोलिस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती सर्व आर्थिक मदत करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहर पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन वाहनांमुळे पोलीस शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचून नागरिकांना तत्पर सेवा-सुविधा देतील असा विश्‍वासही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी नवीन वाहनांमुळे पोलीस विभागास अधिक सक्षमपणे काम करता येईल ,असे सांगत भविष्यात नागरिकांना तात्काळ मदती करता टोल फ्री क्रमांक डायल- 112 ची उभारणी करण्यात येणार आहे.त्यामुळे गस्तीवरील वाहनांना नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचत त्यांना मदत करता येईल. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत शहर पोलिसांच्या ताफ्यात नवीन चारचाकी वाहने उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री सुभाष देसाई यांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com