एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर
महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर

तिसर्‍यांदा परीक्षा पुढे ढकलली

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

एमपीएससीकडून 13 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात 13 सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने हा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता 20 सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसर्‍यांदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक 17 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, 13 सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने आता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. Maharashtra Public Service Commission (MPSC)

आयोगामार्फत आयोजित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार्‍या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे एमपीएसीने कळवले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com