बारामती -

केंद्र सरकारने नव्या कृषी कायद्यांत बदल करावा; पण कायदा रद्द करू नये अन्यथा शेतकर्यांच्या पायातील बेड्या सुटणार

नाहीत, असे रयत क्रांतीचे संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस आणि डाव्यांची फूस आहे. त्यामध्ये नक्षलवाद आणि दहशतवाद माजवू पाहणारे घुसले आहेत असेही ते म्हणाले.

सदाभाऊ खोत आज 2012 च्या ऊस दरवाढ आंदोलनासंबंधी दाखल गुन्ह्याच्या सुनावणीसाठी बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीत 32 वर्षांपूर्वी शरद जोशी आणि महेंद्रसिंह टिक्कैत यांनी शेतकर्यांचा महाकुंभमेळा आयोजित केला होता. त्यावेळी लायसन्स, परमीट राज बंद करा, शासनाचा शेतीतील हस्तक्षेप कमी करावा, बाजारपेठेचे स्वातंत्र द्यावे, कर्जमुक्ती द्यावी अशा मागण्या होत्या. त्या आंदोलनात टिकैत यांनी गुंडागर्दी करत जोशींना व्यासपीठावरून ढकलून दिले. त्यानंतर सरकारने आंदोलन मोडीत काढले. त्यावेळी जोशींच्या डोळ्यातील अश्रू आज महेंद्रसिंह यांचे पुत्र राकेश यांच्या डोळ्यात दिसत असल्याची आठवण खोत यांनी करून दिली.

केंद्राने अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करावा, आयात-निर्यात धोरण पाच वर्षांसाठी आखावे, अनावश्यक शेतमाल आयात करू नये, सिंलिंग अॅक्ट रद्द करावा, भीकवादी योजना रद्द करून रोजगारवादी योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.