मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवत आहे. दरम्यान राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ने छापा टाकला असून, जावई समीर खान यांना NCB कडून ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, 'कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी काल (बुधवार) सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. संध्याकाळी समीर खान यांना एनसीबीने अटक केली.