नारी शक्ती! महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

नारी शक्ती! महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

मुंबई | Mumbai

आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे. अशापैकीच एक आहेत महिला पोलीस कर्मचारी तृप्ती मुळीक, ज्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य केले.

राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केल्याची ही पहिलीच घटना आहे. तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. यावेळी गाडीत अजित पवारांसोबत सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,सतेज पाटील देखील होते. सोशल मीडियावर मुळीक यांचे अजित पवारांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून याचं कौतुक करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या विकासकामांना दिलेल्या निधीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. याचसोबत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.

कोण आहे तृप्ती मुळीक?

तृप्ती मुळीक गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत. २३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा अशा भावना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com