मुंबई -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले

आहे. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणे आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळेच, राणे महाविकास आघाडीवर, मुख्यमंत्र्यावर जहाल टीका करतात, पण मी शरद पवारांवर टीका करणार नाही, असेही ते जाहीरपणे सांगतात. नारायण राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यातही शरद पवारांची उपस्थिती होती. तर, स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेवेळेही राणेंची शरद पवार यांचा सल्ला घेतला होता. यावरुन, या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध दिसून येतात. त्यामुळेच, राणेंनी फोनवरुन चौकशी करण्याऐवजी थेट ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवर सांगितले होते. भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी यांनी ट्विटवर म्हटले आहे.