
नागपूर | Nagpur
नागपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले आहेत. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळुन आले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये गुदमरून तीन या तीनही मुलांचा मृत्यू झाला आहे. १७ जून रोजी दुपारपासून ही तीनही मुले बेपत्ता होती. पण आता त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचं गांभीर्य प्रचंड वाढलं आहे.
तौफिक फिरोज खान (४), आलिया फिरोज खान (६) आणि आफरीन इर्शाद खान (६) हे तीनही मुलं शनिवारी दुपारी टेका नाका येथील फारुख नगर मैदानात खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. उशिरापर्यंत मुले न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यामध्ये न सापडल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पाचपावली पोलिसांत करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम सुरू असताना, लोक तिथून जात असताना त्यांना तेथे उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येत होती. यानंतर कार उघडली असता तेथे तीन मुलांचे मृतदेह दिसले. बालकांच्या मृतदेहाची माहिती तातडीने पाचपावली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले.
कारमध्ये बिघाड झाला होता. आणि गेल्या अनेक दिवसांपासून कार तिथेच उभी होती. कारच्या दरवाजाही खराब होता. ही घटना ज्या भागात घडली तो विणकरांचा परिसर आहे. मृत मुलांचे पालकही विणकर आहेत. गुदमरून मुलांचा मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी अपहरणाच्या कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘खेळत असताना मुलांनी कारचा दरवाजा आतून बंद केला असावा आणि नंतर तो उघडता आला नाही. त्यातच उष्णता आणि गुदमरून या तीनही मुलांचा मृत्यू झाला असावा. मृतांपैकी तौफिक आणि आलिया ही भावंडे आहेत, तर आफरीन ही त्यांच्या शेजारीच राहत होती. मात्र, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.’