
नागपूर | Nagpur
नागपूर खंडपीठामध्ये (Nagpur HighCourt) आज एक आश्चर्यकारक घटना घडली. भर कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी (Justice Resigned In Courtroom) राजीनामा दिला. त्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी बदलीमुळे व्यथित होत रोहित देव यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव हे आज कोर्टरुममध्ये दाखल झाले. त्यानंतर उपस्थितांना बोलतांना त्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त केली. मी राजीनामा देत आहे, माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला.
न्या. देव यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता व केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएल. बी. पदवी प्राप्त केली आहे.
त्यानंतर त्यांनी वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केले. १९९० पासून त्यांनी स्वतत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी ३० वर्षांच्या वकिली व्यवसायात विविध प्रकारची प्रकरणे हाताळली होती.
दरम्यान, न्यायमूर्ती रोहित देव हे दीड ते दोन वर्षांनंतर निवृत्त होणार होते, असे सांगितले जात आहे. परंतु त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला. बदलीमुळे व्यथित होत राजीनामा दिल्याचे बोलले जातेय. मात्र राजीनाम्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.