Mumbai Rain : विक्रोळी, चेंबूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी व्यक्त केला शोक!

केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
Mumbai Rain : विक्रोळी, चेंबूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी व्यक्त केला शोक!

मुंबई l Mumbai

मुंबईसह उपनगरमध्ये काल रात्रीपासून पावसाने (Mumbai Rain) पुन्हा जोर धरला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे.

मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका (Chembur Vashinaka)परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळली. दरडीचा भार संरक्षक भिंतीवर आल्याने ही भिंतच घरांवर कोसळली. अद्याप रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) सुरु आहे.

आतापर्यंत या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे.

तसेच विक्रोळीतही (Vikroli) एक दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. सुरूवातीला तीन जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं म्हटलं होतं. पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, आणखी ५ ते ६ जण ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंतप्रधान मोदींनीदुःख व्यक्त केले असून मदतीची घोषणा केली आहे. यावर दुःख व्यक्त करताना मोदी म्हणाले, 'मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये भिंत कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाल्याने दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबासोबत आहेत. यात जे लोक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.'

यावेळी त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा केली.

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती घेऊन त्यांनी ट्विट केलं आहे. ‘ही घटना हृदयद्रावक असून मी स्तब्ध आहे. या दुर्घटनेत कुटुंबिय गमावलेल्या नागरिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. न भरून निघणाऱ्या या नुकसानाप्रती मी संवेदना व्यक्त करतो,’ असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही (Railway) असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.

मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खूप वर गेली ३.३ मीटर अशी धोक्याची पातळी आहे. मात्र आता मिठी नदीचे पाणी ४.२ झाले आहे, म्हणजे ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com