मुंबई -

मुंबईत करोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून करोनाला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा जमावबंदीचं

144 कलम लागू करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 144 कलम लागू राहणार आहे. यामुळे चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसल्यास मुंबई पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. मुंबई पोलिसांची ही ऑर्डर नित्यक्रमाचा भाग असून अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आधीच्या आदेशात सूट देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत. ही ऑर्डर दर 15 दिवसांनी होणार्या मुंबई पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग असून कोणताही नवा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबईत बुधवारी 2352 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. दररोज दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या 31 हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग सध्या 1.28 वर गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 35 हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 77 टक्के आहे.