
मुंबई | Mumbai
धूलिवंदच्या गाण्यांच्या गजरात रंगांचा सण होळी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीमंत असो की गरीब, सर्व एकाच रंगात दिसत होते. सर्वत्र धूलिवंद साजरी करण्यात आली. लहान मुले, वृद्ध, तरुण असे सगळेच होळीच्या मस्तीत होते. होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
दरम्यान, मुंबईमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. पाण्याचा फुगा डोक्यात लागल्याने एका ४१ वर्षीय व्यक्तीचा जीव गमवावा लागला आहे. सोमवारी (६ मार्च २०२३) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबईतल्या विले-पार्ले या ठिकाणी दिलीप धावडे या ४१ वर्षीय तरूणाचा डोक्यात पाण्याचा फुगा लागल्याने मृत्यू झाला. दिलीप धावडे हा तरूण एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये काम करतो. रात्री १०.३० च्या सुमारास दिलीप धावडे आपल्या कुटुंबासाठी पुरणपोळी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे.
दिलीप धावडे हे पुरणपोळी घेऊन चालले होते तेव्हा त्यांच्या अंगावर कुणीतरी पाण्याने भरलेला फुगा फेकला. ज्यानंतर ते खाली कोसळले. त्यांना हाका मारल्या गेल्या,बेशुद्ध झालेत असं वाटून शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्न केला गेला पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना तातडीने कूपर रूग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.