मुंबई l Mumbai

करोना काळात खबरदारी घेत मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local) अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत.

१ फेब्रुवारी पासून लोकलसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

तसेच मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.