
मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात पोहोचणारी गरीब रथ म्हणून लालपरी अर्थात एसटी महामंडळाच्या बसकडे पाहिलं जातं. पण गावागावात पोहोचणाऱ्या एसटी बसचे अनेक वेळा दुरवस्था झालेले व्हिडीओ समोर आले आहे. आता बसचा अजुन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये बसचा चालक चक्क एका हातात छत्री तर एका हाती स्टेअरिंग धरत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नव्या व्हिडिओमुळे एसटी बसचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते व त्यावर धावणाऱ्या लाल परीची स्थिती भयावह होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे काढणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र, सुधारणा, बदल असं काहीच होताना दिसत नाहीय. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील एका बसचे छत हवेत उडत असल्याचा प्रकार उजेडात आला होता.
बसचा हा व्हिडिओ पाहून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ‘राज्यभरात सामान्य प्रवाशाची ‘लालपरी’ सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘जलपरी’ झालीय. हे ‘सामान्यांचं सरकार’ आहे असं भासवणाऱ्या सरकारला मात्र सामान्य माणसांविषयी काहीही देणंघेणं नसल्याचंच यातून सिद्ध होतं असल्याचे म्हटलं आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना ही गळणारी बस दिसेल काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर, त्यापूर्वी बसमधील छतावरून पावसाचे पाणी गळत असल्यामुळे प्रवासी सीटवर छत्री घेऊन बसून असल्याचा व्हिडीओदेखील समोर आला होता. तर, आता चक्क चालकच छत्री घेऊन दुसऱ्या हाताने बसचे स्टेअरिंग सांभाळताना दिसत आहे. या चालकाच्या एका हातात छत्री तर दुसऱ्या हाती चक्क प्रवाशांचे प्राणच असल्याचे यातून दिसून येते. हा व्हिडीओदेखील गडचिरोली जिल्ह्यातील असून यातून एसटी बसची स्थिती व प्रवाशांचे हाल 'बेहाल' असल्याचेच चित्र स्पष्ट होते.
सरकारने एसटी बसमध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिल्यानंतर एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पण एसटीमध्ये सुधारणा व्हावी आणि नव्या बसेस सेवेत याव्यात अशी मागणी प्रवासी करत असतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.