मुंबई | Mumbai

करोना काळात MPSC परीक्षांचे आयोजन रखडले होते. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० (MPSC Prelims) ची नवी तारीख १४ मार्च २०२१ अशी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० ही परीक्षा २७ मार्च तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० आता ११ एप्रिल २०२१ दिवशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.