एमपीएससी : विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेज

वैयक्तिक प्रोफाईलमध्ये उपलब्ध होणार ‘ही’ माहिती
एमपीएससी परीक्षा
एमपीएससी परीक्षा

मुंबई -

महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेज आणि

निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची ‘किमान सीमांकन रेषा’ याबाबतची माहिती संबधित परीक्षेच्या निकालानंतर उमेदवाराच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देणार आहे. उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. 7) याबाबत आयोगाने पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

आयोगाने पत्रकात म्हटले आहे की,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणार्‍या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. त्यापैकी भाग-1(मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग-2(कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास देण्यात आली आहे.

उमेदवारांने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे उद् घृत केलेल्या सूचनांनानुसार नोंदवणे(वर्तुळ छायांकित करणे) गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग-2(कार्बन प्रत) वरून उमेदवारास त्याने संबधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालकेवरून पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारास प्राप्त होऊ शकणार्‍या गुणांचा अंदाज बांधता येतो. उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी खालील तपशील संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

1. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज

2. निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण

3.उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा

आयोगाचा उपरोक्त निर्णय 1 ऑक्टोबर 2020 नंतर आयोजित होणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे. े

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com