
मुंबई | Mumbai
काल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी फोन केला होता, असा गंभीर आरोप केला होता. तसेच कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी (MLA Ravindra Dhangekar) पत्रकार परिषद घेत ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात आहे, असे म्हटले होते.
त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत "सुषमा अंधारे यांचा महिला म्हणून आदर करतो. त्यांना ज्या पद्धतीची चौकशी अपेक्षित असेल त्यांनी ती करावी. त्या चौकशीतून जे सिद्ध होईल ते जगासमोर येईल. सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखं आहे. चौकशीमध्ये सत्य समोर येईल आणि नंतर आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा (A Claim For Defamation) दाखल करेल," असा इशारा मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी दिला होता.
यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी 'आमचे नेते पुरावे असल्याशिवाय बोलणार नाहीत', असे म्हणत सुषमा अंधारे यांच्या आरोपांना एकप्रकारे समर्थन दर्शविले आहे. तसेच खासदार राऊत यांनी नाशिक (Nashik) शहराजवळील शिंदे गाव एमआयडीसीमधील (MIDC) ड्रग्ज कारखान्यावरून मंत्री दादा भुसे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी बोलतांना खासदार राऊत म्हणाले की, "ललित पाटील या ड्रग्ज माफियाची काळजी नाशिक भागातील आमदाराने घेतली आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही. या कारखान्यामार्फत त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत होती. या सर्व प्रकरणांची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना पत्र लिहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तसेच ललित पाटील याला शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दादा भुसेच घेऊन आले होते. सुषमा अंधारेंनी दादा भुसेंचे नाव घेतले आहे. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. कसब्याचे आमदार धंगेकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री जे नाशिकचे आहे असे नाव घेतले होते. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय आमचे प्रमुख नेते बोलणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "ड्रग्ज माफियांना संरक्षण देण्याचे काम दादा भुसेंनी केले आहे. धाडी पडल्या त्या कारखान्याशी भुसेंचा संबंध काय? या माफियांकडून किती खोके मिळाले? दादा भुसेंची दादागिरी कधी मोडून काढणार? असा सवालही यावेळी राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच राजकीय विरोधकांवर फक्त ईडी, पोलिसांच्या कारवाया करणार का? असा सवाल करत नाना पटोले, धंगेकर, अंधारेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तर द्या असे संजय राऊतांनी म्हटले आहे.