
मुंबई । Mumbai
राज्याच्या अनेक भागांत सध्या संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच आता पुढील ४ दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील सर्वच भागात पावसाचा जोर दिसून येतोय. मुसळधार पावसामुळे राज्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. काही भागत अतिवृष्टी आणि नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहेत. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पुराचा चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असून 106 टक्के पाऊसांची नोंद झाली आहे. राज्यात यंदा 1 जूनपासून ते 24 जुलैपर्यंत 485.10 मिमीपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांत सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला असून 7 जिल्ह्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण 12 राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओडिशामधील अनेक ठिकाणी फार जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतामधील डोंगराळ भागांमध्येही पुढील आठवड्याभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा दिल्ली जलमय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील यमुना नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. गंगेमधील पाण्याच्या प्रवाहालाही वेग आला आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशमधील अनेक भागांना येत्या काही दिवसात पुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.