
दिल्ली | Delhi
अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चक्रीवादळाच्या (Cyclone Mocha) पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मोचा चक्रीवादळ (Mocha Cyclone) आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain Alert) पडेल असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांना अलर्टही जाहीर करण्यात आला आहे.
विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
कुणी दिलं मोचा हे नाव?
जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्यांनी एका यादी तयार केली आहे. या यादीमध्ये देशांची नाव आहे. प्रत्येक देश एका एका चक्रीवादळाला नाव देतो. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र सध्याच्या चक्रीवादळाचं नाव भारताने सुचवलेलं नाही. अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर चक्रीवादळाचं नाव ठरवणारा एक संघ आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या संघातील प्रत्येक देश चक्रीवादळाचं नाव सुचवत असतो. अर्थात एका देशाला एकच नाव एकावेळी सुचवता येतं, नंतर दुसरा देश चक्रीवादळाला नाव देतो. हे नाव येमेनने सुचवलेलं आहे.
मोचा नावामागची गोष्ट?
येमेनने या चक्रीवादळाचे नाव लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या 'मोचा' या बंदराच्या नावावरुन सुचवलं आहे. त्यामुळे या देशानं चक्रीवादळाला मोचा हे नाव दिलं आहे.