
मुंबई | Mumbai
मुंबईच्या मुलुंडमधील (Mulund) मराठी आणि गुजराती भाषिक वाद ताजा असतांनाच आता कल्याणमध्ये (Kalyan) मराठी बोलण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये वस्तू खरेदीवरून एका विद्यार्थ्याशी फेरीवाल्यांनी उर्मट वर्तन केले. त्यानंतर या फेरीवाल्यांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण (Beating) केली. यानंतर हा प्रकार संबंधित विद्यार्थ्याने कल्याणमधील मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'स्कायवॉक'वर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना 'मनसे स्टाइल'ने चांगलाच चोप दिला...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाशिंदमधील एक विद्यार्थी (Student) कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. त्यावेळी त्याने कल्याणमधील फुटपाथवरील फेरीवाल्याकडून (Hawkers) एक वस्तू विकत घेतली होती. मात्र, ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आला आणि वस्तू बदलून मिळण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. परंतु, फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर त्याने 'तुम मराठी लोक ऐसें ही होते हो' असे वक्तव्य केले.
यानंतर त्या विद्यार्थ्याने मराठी माणूस आणि मराठी भाषेवर काही बोलू नका, असे सांगितले. अन्यथा मी मनसेवाल्यांकडे जाईल, असे म्हटले. याचवेळी तेथील तीन-चार जणांनी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. या घडलेल्या प्रकाराची तक्रार त्या विद्यार्थ्याने कल्याण पूर्व मधील मनसे शाखेत केली. त्यानंतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 'स्कायवॉक'वर जात तेथील परप्रांतीय फेरीवाल्यांना (Foreign Hawkers) चोप दिला.
दरम्यान, त्यानंतर त्या फेरीवाल्यांना पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. तसेच या घटनेवरून परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.