मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात असल्याचा आरोप
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे (प्रतिनिधी) | Pune -

सामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही. तर, दुसरीकडे, शेतकरीवर्ग शेतमालाला बाजारभाव नसल्याने हतबल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत महावितरणकडून अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात आहे असा आरोप करीत संतापलेल्या

खेड तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर चांडोली येथील कार्यालयात घुसून संताप व्यक्त केला तसेच कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोडही केली.

राजगुरुनगर, चाकण आळंदीसह खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणूनच नागरिकांना घरात रहाण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही. तर, दुसरीकडे, शेतकरीवर्ग शेतमालाला बाजारभाव नसल्याने हतबल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत महावितरणकडून अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात आहे. यावेळी महावितरण कार्यालयात बिल दुरुस्तीसाठी नागरिक गर्दी करत आहे. मात्र, महावितरण कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने वीजबिल कमी करून मिळत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पहायला मिळत आहे.अवाजवी वीजबिलांचा मुद्दा घेऊन खेड तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर चांडोली येथील कार्यालयात घुसून संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.

यावेळी, आम्हाला तोडफोड करण्याची गरज नाही, मात्र महावितरणकडून कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी लूट सामान्य नागरिकांना आणखी अडचणीत आणणारी आहे. त्यामुळे, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्हाला खळखट्याकचा पर्याय हातात घ्यावा लागला, असे मनसेचे उपाध्यक्ष नितीन ताठे यांनी सांगितले.राजगुरुनगर चांडोली येथील महावितरण कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड झाल्यानंतर राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी कार्यालयाची पहाणी केली. याचवेळी महावितरण कार्यालय परिसरात सामान्य नागरिकांकडून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबतही संताप व्यक्त केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com