
मुंबई | Mumbai
नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय (Nanded Government Hospital) रुग्णालयात अवघ्या २४ तासांत २४ रुग्णांचा (24 Patient Dead In 24 Hour) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे हे रुग्ण दगावल्याचे बोलले जात असून त्यावरून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हणाले, "नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असे कळतेय.
या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिने लागून पण राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?, सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये, पण महाराष्ट्राचे काय?... दुर्दैव असे की, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १ कोटी रुपयांत यंत्रसामग्री, १ कोटीची औषध खरेदी, १ कोटी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन प्लँटसाठी ठेवण्यात आले आहेत.
परंतु प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘हाफकिन’ने औषध खरेदी करून न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.