
मुंबई | प्रतिनिधी
पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा, अशी मागणी कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरला मतदार नोंदणीला सुरुवात झाली असून ही मुदत ६ नोव्हेंबर २०२३ अशी आहे.
मात्र, महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन लक्षात घेता मतदार नोंदणीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांची नाव नोंदणी व्हावी म्हणून नोंदणीच्या कालावधीमध्ये वाढ करावी, अशी मागणी लोढा यांनी पत्रात केली आहे.