करोना उपचारासाठी लागणारी औषधे स्वस्त होणार

जीएसटी कमी करण्याची शिफारस परिषदेत मान्य
करोना उपचारासाठी लागणारी औषधे स्वस्त होणार

मुंबई । प्रतिनिधी

करोना उपचारासाठी लागणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे यावर आकारण्यात येणारा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची शिफारस मान्य झाल्याने या वस्तू स्वस्त होणार आहेत.

करोनाची औषधे, वैद्यकीय उपकरणे यावर आकारण्यात येणारा जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रिगटाने केलेल्या शिफारशी ४४ व्या जीएसटी परिषदेने शनिवारी मान्य केल्या. त्यामुळे ऑक्सिजन आणि संबंधित सामग्रीवर १२ ऐवजी आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. कोरोनासंबंधीत बहुतांश सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी केल्याने कोरोनावरील उपचाराचा खर्च कमी होणार आहे. जीएसटी परिषदेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वित्तमंत्री तथा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला सीतारामन आणि सदस्यांचे आभार मानले आहेत.

जीएसटी परिषदेची बैठक आज झाली. त्या बैठकीत या शिफारस अहवालाला मान्यता देण्यात आली. कोरोनाविरुद्धची लढाई सहज, सोपी, सुसह्य करण्यासाठी कोरोनावरील औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्याची, त्यावरील कर कमी किंवा माफ करण्याची मागणी अजित पवार यांनी २८ मे रोजी झालेल्या जीएसटी परिषदेत केली होती. या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय वित्तमंत्रालयाने दुसऱ्याच दिवशी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, अजित पवार यांच्यासह आठ राज्यांच्या उपमुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन केला होता. या मंत्रिगटाने आठ दिवसात जीएसटी कमी करण्यासंदर्भातला शिफारस अहवाल केंद्राला सादर केला.

त्यानंतर चार दिवसात जीएसटी परिषदेची बैठक होऊन मंत्रिगटाने केलेल्या सर्व शिफारशी मान्य केल्या. मंत्रिगटाने शिफारस केलेले आणि जीएसटी परिषदेने मान्य केलेले कराचे नवीन दर पुढीलप्रमाणे असतील.

ऑक्सिजन आणि संबंधित सामग्री

वैद्यकीय ऑक्सिजन, आक्सिजननिर्मिती आणि संबंधित सामग्रीवर आता १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, वैयक्तिक उपयोगासह सर्व प्रकारचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर-जनरेटर, व्हेंटीलेटर्स, व्हेंटीलेटर मास्क, कॅन्युला, हेल्मेट, बायपॅप मशिन, हाय फ्लो नॅसल कॅन्युला (एचएफएनसी) या साहित्यावर आतापर्यंत १२ टक्के जीएसटी होता, तो ५ टक्के झाला आहे.

करोना चाचणी आणि संबंधित

कोविड चाचणी संच - १२ ऐवजी ५ टक्के, आरटीपीसीआर मशिन - १८टक्के कायम, आरएनए एक्स्ट्रॅक्शन मशिन- १८टक्के कायम, कोविड चाचणी संचासाठी आवश्यक सामग्री – प्रचलित दरानुसार, जिनोम सिक्वेन्सिंग किट - १२टक्के कायम, जिनोम सिक्वेंन्सिंग मशिन- १८ टक्के कायम, स्पेसिफाईड इन्फ्लेमेटरी डायग्नॉसिस किट (डी-डिमर, आयएल-६फेरिटीन आणि एलडीएच) - १८ ऐवजी ५ टक्के असे नवीन दर असतील.

कोविडसंबंधित अन्य सामग्री

वैयक्तिक उपयोगासाठी आयातीतसह सर्व पल्स ऑक्सिमिटर- १२ ऐवजी ५टक्के, हॅन्ड सॅनिटायझर- १८ ऐवजी ५ टक्के, पीपीई किट- ५टक्के कायम, एन ९५ - ५ टक्के कायम, ट्रिपल लेयर- ५ टक्के कायम, सर्जिकल मास्क- ५ टक्के कायम, टेम्परेचर चेक इक्विपमेंट- १८ ऐवजी ५टक्के, रुग्णवाहिका- २८ ऐवजी १२ टक्के, पोर्टेबल हॉस्पिटल युनिट (फिरते दवाखाने) - १८ टक्के कायम, वीज आणि गॅसवर चालणारी शवदाहिनी- १८ ऐवजी ५ टक्के.

करोनावरील औषधे आणि लस

रेमिडिसिव्हिर- १२ ऐवजी ५ टक्के, टोसिलीझुमॅब- ५ ऐवजी ० टक्के, अॅम्फोटेरिसिन बी- ५ ऐवजी ० टक्के, अॅन्टी-कोअॅग्युलन्ट (हेपॅरिन व तत्सम) - १२ ऐवजी ५ टक्के, एमओएचएफडब्ल्यु आणि औषधविभागाने शिफारस केलेली अन्य औषधे – प्रचलित दराऐवजी ५ टक्के.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com