
महाड | Mahad
रायगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाड MIDC तील मल्लक स्पेशालीटी या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आग लागल्यानं कारख्यान्यामध्ये छोटे-छोटे स्फोट देखील होत आहेत. आगीने रौद्ररूप धारणे केले असून, धुराचे लोट लांबपर्यंत दिसत आहेत. या घटनेनं परिसरात घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून गेल्या अर्ध्या तासापासून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मल्लक स्पेशालिटी ही कंपनी महाड एमआयडीसी येथे रंग निर्मितीचे काम करते. रंगनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर सरायनांचा वापर केला जातो. त्यामुळे ही कंपनी रासायनिक रसायनांचा साठा करते. या साठ्यात इथेनॉल ऑक्साईडचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्याचाच स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
कंपनीतील ज्वालाग्राही पदार्थांनी पेट घेतल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकत आहेत. दरम्यान, आगिमध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी, कोणत्याही प्रकारे जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्यापपर्यंत तरी नाही. कंपनीतील कामगार आणि स्थानिक सांगत आहेत की कंपनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक साठा आहे. त्यातच रंगांचाही साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जोपर्यंत हा साठा जळून खाक होत नाही. तोपर्यंत आगिवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे.
महाड एमआयडीसीमध्ये गेल्या १५ दिवसांत आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, महाड एमआयडीसीच्या प्रिव्ही स्पेशालीटी कंपनीच्या युनिट २ मध्ये गेल्या महिन्यात २८ जानेवारीला आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.