ग्रामस्थांच्या साक्षीने ‘आस्मा-गोपाल’चे शुभमंगल
महाराष्ट्र

ग्रामस्थांच्या साक्षीने ‘आस्मा-गोपाल’चे शुभमंगल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

‘टिक-टॉक’च्या माध्यमातून जुळले शेंगोळा-कोल्हापूर

जामनेर – 

त्याने ‘टिक-टॉक’वर तीचे व्हिडिओ बघितले. त्याला तिचे व्हिडिओ आवडले. व्हिडिओ पाहून त्याने तिला लाईक केले. त्याने ड्यूएट करून दोघांचे संभाषण सुरू झाले. ‘तू खूप छान व्हिडीओ बनवते, मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात, मी नेहमी तुझे व्हिडिओ बघतो. तिने ही त्याला थँक्स’ म्हटले. तालुक्यातील शेंगोळा येथील रिक्षाचालक गोपाल व कोल्हापूरची आस्मा या दोघांचे ‘टिक-टॉक’वर अशाप्रकारचे संभाषण सुरु झाले. संभाषणाचे रूपांतर प्रेमात झाले व आज या दोघांचा प्रेमविवाह गावकर्‍यांच्या साक्षीने शेंगोळा येथे थाटात संपन्न झाला.

कोल्हापूरची आस्मा शेख (वय 23) हिचा सात-आठ वर्षांपूर्वी समाजातील एका तरुणाशी विवाह संपन्न झाला होता. परंतु, मुलगी सहा महिन्यांची असतानाच आस्माचा पती अपघातात निधन पावला. तेव्हापासून आस्मा ही आपल्या आईकडे कोल्हापूर येथे वास्तव्यास होती. तिला ‘टिक-टॉक’वर व्हिडिओ बनविण्याची खूप आवड. व्हिडिओ तयार करून ती नेहमी ‘टिक-टॉक’वर शेअर करायची. जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील रिक्षाचालक गोपाल गिरी गोसावी त्यांची घरची परिस्थिती जेमतेम. आई, वडील व भावासोबत राहून तो रिक्षा चालवून आपला चरितार्थ चालवतो. परंतु, त्यालाही ‘टिक-टॉक’ची फार आवड. तो नेहमी आस्माचे व्हिडिओ बघायचा.

पंधरा दिवसांपूर्वी त्याने आसमाला लाईक करून ड्यूएट केले व दोघांचे संभाषण ‘टिक-टॉक’वर सुरू झाले. या संभाषणाच्या रूपांतर प्रेमात होऊन गोपालने आसमाला लग्नाची ऑफर दिली. आसमाने तिच्या जीवनाची पूर्वकहाणी त्याच्यासमोर कथन करून त्याला वस्तुस्थिती सांगितली. तू आहे तशी तुला स्वीकारायला मी तयार आहे, असे सांगून गोपालने तिच्यासोबत विवाहाची तयारी दर्शवली.

तिच्या आईने तसेच गोपाळच्या आई-वडिलांनीही दोघांच्या लग्नाला संमती दिली. ठरल्याप्रमाणे आसमाच्या आईने आसमाला पुण्यापर्यंत आणून सोडले. परवा गोपालही पुण्यात दाखल झाला आणि हे दोघे काल शेंगोळा येथे घरी आले व आज मोठ्या थाटात सर्व गावकर्‍यांच्या संमतीने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे आसमाचे गोपाल गिर गोसावी यांच्यासोबत लग्न झाले.

मोठी गावपंगत शेंगोळे येथे संपन्न झाली आणि आसमा आज अखेर आसमाची शिवानी झाली. तिच्या साडेसहा वर्षे वयाच्या मुलीचे ही पालनपोषणाची जबाबदारी गोपाल गिरी व तिच्या आईने घेतली. मला अतिशय चांगली सून मिळाली मी तिचा आनंदाने स्वीकार करून मुलीसारखा सांभाळ करेल, असे गोपालची आई संगिता गिरी यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

वैवाहिक दाम्पत्य उद्या कोर्टामध्ये कायदेशीररित्या नोंदणी करणार असल्याचेही त्यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले. या विवाहाला माजी सरपंच दिलीप रदाळ, महेंद्र पाटील, देवगिर गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, प्रल्हाद गोसावी, धर्मा गोसावी व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com