
जालना | Jalna
जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यामधील (Ambad Taluka) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गेल्या १७ दिवसांपासून उपोषण (Hunger Strike) सुरू होते. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सातत्याने शिष्टमंडळ देखील पाठविले जात होते. पंरतु, या शिष्टमंडळाला त्यांची मनधरणी करतांना अपयश येत होते...
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले.
जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर आत आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? याबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की मराठा समाजाला न्याय देतील ते फक्त एकनाथ शिंदेच आहेत. तीच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे.
सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला होता. याआधी मी समाजाला विश्वासात घेतले. बैठका घेतल्या. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का? तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचे का? हे प्रश्न मी सगळ्यांना विचारले त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला. समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस देतो फक्त आरक्षण द्या. जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील. माझ्या बापाच्या कष्टाचे खाऊन समाजाचे काम करतो. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी शिंदेंना येथे आणूनच दाखवले.
तुम्ही कसलीही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. त्यांनाही माहिती आहे. कारण, एकनाथ शिंदे हेच आपल्याला आरक्षण देऊ शकतात अशी माझी खात्री असल्याचा विश्वास यावेळी जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.