Maratha Reservation : मूक आंदोलनात लोकप्रतिनिधींनी मांडल्या भूमिका; वाचा कोण, काय म्हणालं

Maratha Reservation : मूक आंदोलनात लोकप्रतिनिधींनी मांडल्या भूमिका; वाचा कोण, काय म्हणालं

कोल्हापूर l Kolhapur

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात भर पावसात मूक आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. पावसाची संततधार असतानाही राज्याच्या विविध भागातील मराठा महासंघाचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनीही गर्दी केली.

दरम्यान या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित असून यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत भूमिका मांडली.

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केलं. आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या, असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केलं.

संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार - सतेज पाटील

सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. 'महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. पालकमंत्री म्हणून माझं जाहीर निमंत्रण आहे की, उद्या राजेंनी मुंबईत यावं. उद्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील. आपण आणि सरकार मध्ये चर्चा व्हावी. तसेच मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्यात समन्वय साधण्याची जबाबदारी संभाजीराजेंनी घ्यावी, तसंच संभाजी राजेंनी मांडलेल्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे' असंही सतेज पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे - धैर्यशील माने

कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सलाईन लावून आंदोलनात सहभागी झाले. यावेळी ते बोलताना म्हणाले, 'महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.

शासनाला स्वस्थ बसू देणार नाही - हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री बोलताना म्हणाले की, 'मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती.' तसेच, 'कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. सर्व विषय पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, ही ग्वाही मी देतो. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी कालच यावर चर्चा केली. त्यांनी चर्चेसाठी कधीही तयार असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाने संयम दाखवला आहे. या समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला आम्ही स्वतः स्वस्थ बसू देणार नाही, त्यासाठी वाटेल ती किंमत त्यासाठी मोजू, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com