मराठा आरक्षण : संभाजीराजेंचा राज्यभर दौरा सुरु, पुढची दिशा ठरवणार

मराठा आरक्षण : संभाजीराजेंचा राज्यभर दौरा सुरु, पुढची दिशा ठरवणार

कोल्हापूर | Kolhapur

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेणार याकडे समाजाचे लक्ष लागले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला वंदन करून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.

मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या २७ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

खासदार संभाजीराजे बोलताना म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला, जो गायकवाड कमिशनच्या माध्यमातून आरक्षणाचा अहवाल देण्यात आला होता. तो पूर्णपणे धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे यापुढे समाजानं आपली भूमिका कशी मांडायची, मार्ग काय काढायचा या दृष्टीकोनातून मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे.'

तसेच, 'राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो. मला अत्यंत आनंद झाला. मी गहिवरुन गेलो, भारावून गेलो. ही शाहू महाराजांची नगरी, शाहू महाराजांनी जी दिशा राज्याला आणि देशाला दिली. ती पुरोगामी चळवळीची आहे. आणि संपूर्ण पुरोगामी चळवळच ही आहे की, संपूर्ण बहुजन समाजाला कसं एकत्र आणता येईल, या समाजाला न्याय कसा देता येईल. म्हणून १९०२ ला बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाजावर अन्याय झालाय. आताही माझ्या आजूबाजूला जी लोकं आहेत. ती समाजातील बारा बलुतेदारांनी समाजाला एकत्र येऊन पाठिंबा दिलाय. शाहू महाराजांचा विचार कोल्हापुरातील सर्व बहुजन समाजातील लोकांनी जपलाय आणि यापुढेही जोमानं हा विचार जपू, असा संदेश या लोकांनी आज दिलाय. यामुळे मी आज सर्वांचे आभार मानतो.'

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आज मी मराठवाडा, खान्देश आणि २७ तारखेपासून मुंबईत येणार आहे. मराठा आरक्षणाविषयी अनेक कायदेतज्ज्ञांनी, अभ्यासकांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माझाही थोडा अभ्यास झाला आहे. पण या गोष्टी मांडत असताना आंदोलन करणं हा एक भाग आहे. पण आंदोलनाच्या बरोबरीने आपल्यालासुद्धा मार्ग काय काढता येईल, आपण राज्य सरकारला, केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो. हे समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहे, अशा गोष्टी समाजाकडून समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे.'

तसेच राजकीय पक्षांकडून तुम्हाला काही ऑफर येत आहे का असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, 'मला अशी कोणतीही ऑफर आली नाही, मी पहिल्यांदाच असं काही ऐकत आहे. जर काही ऑफर आली तर मला सांगा', अशी मिश्किल प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com