Maratha Andolan : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, मोठा निर्णय घेणार?

Maratha Andolan : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, मोठा निर्णय घेणार?

मुंबई | Mumbai

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. त्यातच राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नसल्याने आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान मराठा समाजासह विरोधकांनी सरकारला यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय. या पार्श्वभूमीवर आज (4 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही मुख्यमंत्र्यांना या विषयावर चर्चेची विनंती केली होती. मराठा आंदोलक नेत्यांसोबत लवकरच सरकार बैठक घेणार आहे. मराठा आरक्षणासंबंधीच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ही सर्व माहिती उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या आधी शनिवारी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. 'नोव्हेंबर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारनं मराठा आराक्षणाची घोषणा केली होती. उच्च न्यायालयानही हा निर्णय कायम ठेवला. पण सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. हे कोणाच्या निष्काळजीपणामुळं घडलं हे सर्वांनाच माहीत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. हे प्रकरण न्यायालयात लढण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. काही अडचणी आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यावरून सरकारला टीकेचा सामना करावा लागतोय. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांना या परिस्थितीतून राजकीय फायदा घ्यायचा आहे त्यांच्यापासून सावध राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 'मी मराठा समाजाला आवाहन करतोय. त्यांनी आतापर्यंत आपल्या भावना अत्यंत संवेदनशीलपणे आणि शांतपणे व्यक्त केल्या आहेत. कृपया संयम बाळगा आणि कायदा हातात घेऊ नका', असं एकनाथ शिंदे म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com