
जालना | Jalana
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमरण उपोषण करताना कुणाच्याही जिवाला धोका निर्माण झाला, तर सगळी जबाबदारी मु्ख्यमंत्री आणि सरकारची असेल, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला. यामुळे सरकारचं टेन्शन वाढलंय.
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौथ्या दिवशी सकाळी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली होती. मात्र तरी देखील त्यांनी उपचारास नकार दिला. यानंतर जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटलांनी यावेळी आंदोलनाचा दुसरा आणि तिसरा टप्पा जाहीर केला. उद्या 29 ऑक्टोबरपासून ज्या ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे, त्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरूवात करा. या उपोषणात संपूर्ण गावांनी सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे. आमरण उपोषण करताना जर कुणाच्याही जिवाला धोका निर्माण झाला तर सगळी जबाबदारी मु्ख्यमंत्री आणि सरकारची असेल,असा इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्या गावात येऊ द्यायचं नाही आणि आपणही कोणत्याही नेत्याच्या दारात जायचं नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली.
मराठा समाजाच्या तिसऱ्या टप्प्याचे आंदोलन 1 नोव्हेंबरपासून सूरू होणार आहे. त्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनाला सहज घेऊ नका, गांभिर्याने घ्या. कारण पुढचा रस्ता तुमच्यासाठी जड आणि अवघड असणार आहे. तुम्हाला आंदोलन झेपणार नाही आहे, असे जरांगे पाटील म्हणालेत. दरम्यान प्रसिद्धी माध्यमांनी यावेळी जरांगे पाटलांना त्यांच्या प्रकृतीबाबतही विचारणा केली. यावर जरांगे पाटील म्हणाले, पाणी पोटात नसल्याने थोडासा त्रास होतोय, पण माझ्यापेक्षा माझ्या पोरांना त्रास होतोत. पोरांना मोठं होऊ दिलं जात नाही, त्याचं करिअर उद्ध्वस्त केलं जातंय.