
जालना | Jalna
मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगे म्हणाले, सरकारला वेळ आता कशासाठी पाहिजे? मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? सर्वपक्षीय बैठकीचा तपशील घ्यायची माझी इ्च्छा नाही. गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष द्यायचे सोडून, सरकार बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या घडत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतं. त्यामुळे सरकारला सुटी नाही. आरक्षण द्या, आणखी वेळ कशाला पाहिजे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का? असा सवाल जरांगेंनी सर्वपक्षीयांना केला आहे.