
मुंबई | Mumbai
राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आज घराघरात आणि सार्वजनिक उत्सव मंडळात मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. गणेशाच्या स्थापनेसाठी आज सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त आहे.
मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात गणरायाचे आगमन होत आहे. आज बाप्पाची वाजतगाजत स्वागत मिरवणूक काढण्यात येत आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिवपती असलेल्या गणरायाच्या स्वागताची अनेक ठिकाणी काल, सोमवारी उशिरापर्यंत तयारी सुरू होती. तर, मोठमोठ्या मंडळांमध्ये आठ-दहा दिवस आधी श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. आज, मंगळवारी गणपतीची मनोभावे प्रतिष्ठापना केली जाईल. त्याला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविला जाईल. त्यामुळे घरातील वातावारण पूर्णपणे चैतन्यमय राहील.
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रासोबतच जगभरात साजरा केला जातो. मुंबईतील गणेशोत्सव हा तर विशेष आकर्षणाचा सोहळा मानला जातो. जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पाची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाची मनोभावे सेवा केली जाणार आहे. हे सर्व दिवस भारावलेले असतात. गणेशभक्त गणरायाच्या दर्शनासाठी आप्तांकडे जातातच, शिवाय विविध सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी लांब रांगामध्येही उभे राहतात. या गणेशोत्सवात गणरायाची नानाविध विलोभनीय रूपे पाहून मन प्रसन्न होते.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
‘लालबागचा राजा’ हा कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या १० दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. लालबागच्या राजाकडे सर्व मनोकामना पूर्ण होतात, मनातील इच्छापूर्ती होते. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविक विश्वासाने येतात. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. पण पहिल्याचदिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. कालपासूनच हजारो भाविक नवसाच्या रांगेत उभे आहेत. लालबागच्या राजाच्या मंडपात मोठी गजबज आहे. सर्वत्र शिट्ट्यांचे आवाज ऐकू येत आहेत. पोलिसांनी इथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आज सकाळपासूनच लालबाग नगरीत उत्साहाच वातावरण आहे. करीरोड, लोअर परेल येथून भक्तगण मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत. आज सकाळपासूनच या भागात मोठी लगबग दिसून येत आहे.
'दगडूशेठ' गणपती आगमन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता होईल. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर श्री हनुमानाच्या ४ मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे.