ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे व्यवस्थापन करा

- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे व्यवस्थापन करा

मुंबई । प्रतिनिधी

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवताना ऑक्सिजन आणि ,रेमडेसिवीरचे व्यवस्थापन करा,असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.

तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा. पॉझीटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणा ऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, अशा सूचनाही टोपे यांनी केल्या.

राजेश टोपे यांनी आज आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. ऑक्सिजिनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष द्या. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोवीड सेंटर्स सुरू आहे त्यांना ही प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात यावे जेणेकरून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालये सक्षम होतील, असे टोपे म्हणाले.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. ॲण्टीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी करून दोन्ही चाचण्या अनुक्रमे ७०:३० या प्रमाणात करण्यात याव्यात. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट २४ तासात मिळाला पाहिजे या प्रयत्न करा, असे निर्देश देतांनाच प्रत्येक जिल्ह्यात डॅश बोर्ड आणि हेल्पलाईनची सुविधा झाली पाहिजे. बाधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्या, अशी सूचना राजेश टोपे यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com