उद्योग आणि जीवनचक्राची गती कायम ठेवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी थांबवण्याचे आदेश
उद्योग आणि जीवनचक्राची गती कायम ठेवा-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ( All District Collectors) त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी ( entrepreneurs ) संवाद साधून करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही ( Third wave of corona ) उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करून त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी दिले. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट राज्यात येऊच नये यासाठी प्रयत्न करताना दुर्देवाने तिसरी लाट आली तर राज्यातील उद्योग सुरु राहिले पाहिजेत आणि त्यामाध्यमातून अर्थचक्र, जीवनचक्र याची गती कायम राहिली पाहिजे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी करोनाची तिसरी लाट आली तरी उद्योग व्यवसाय थांबता कामा नये, अशी सूचना केली.

मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करावी. ज्यांना हे करणे शक्य नाही, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करून नजिकच्या परिसरात ही व्यवस्था निश्चित करण्यास सहकार्य करावे. कामगारांना त्यांच्या कामाच्या स्थळी थेट जा- ये करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.

आपण करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केला. अजून दुसरी लाट ओसरली नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ती अजूनही साडे आठ हजार ते नऊ हजारावर स्थिरावली आहे. अजूनही संख्या खाली जाताना दिसत नाही.

उलट काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील आपल्याला हा जो मधला काळ मिळाला आहे त्यात तिसरी लाट येऊच नये यासाठी किंवा दुर्देवाने आलीच तर त्याची तीव्रता कमी राहील यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यात कोरोना आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याची आणि पर्यटनस्थळी होणारी गर्दी तातडीने थांबवण्याची सूचनाही ठाकरे यांनीजिल्हाधिकाऱ्यांना केली.

केंद्र सरकारकडून तिसऱ्या लाटेची सूचना

आता जगातील अनेक देशात तिसरी लाट येण्यास सुरुवात झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीरही केले आहे. ब्रिटनसारख्या देशात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ज्या देशात लसीकरण झाले, त्या देशातही पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याचाच अर्थ लस घेतली असली तरी आपल्याला कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे आताच्याच कालावधीसाठी नाही तर पुढील एक दोन वर्षासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारनेही तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्व राज्यांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

राज्यात आजघडीला १३०० मे.टन ऑक्सिजन निर्मिती होते. दुसऱ्या लाटेत आपली गरज १७५० मे.टनापर्यंत वाढली होती म्हणजे साधारणत: ५०० ते ५५० मे.टन ऑक्सिजन आपण इतर राज्यातून मागवला. पण आता तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ६० लाखापर्यंत राहील, असा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने दर दिवशी ४००० ते ४५०० मे.टन ऑक्सिजनची महाराष्ट्राला गरज लागेल असा अंदाज आहे. ही परिस्थिती पहाता राज्यातील ऑक्सिजन निर्मितीला वेग द्यावा, राज्यातील ऑक्सिजन साठा पुर्ण क्षमतेने भरावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. कुठल्याही परिस्थितीत राज्यात दररोज ३ हजार मे.टन ऑक्सिजन निर्मिती होईल यादृष्टीने ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

करोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी

कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करून त्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा. गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा. कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा. कोरोना विषाणुमध्ये बदल दिसत असेल तर जिनोम सिकवेन्सी करून घ्या, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.

मेहनतीवर पाणी पडू देऊ नका!

राज्याने एका दिवसात आठ लाख लोकांचे लसीकरण करून उच्चांक स्थापन केला असला तरी लस उपलब्धतेला मर्यादा आहे. त्यामुळे लसीकरणास विलंब होत आहे. काही नागरिकांना तर अजून पहिला डोसही मिळालेला नाही. अशा स्थितीत वाढती रुग्णसंख्या, डेल्टा विषाणुचा उद्भव आणि तिसरी लाट धोक्याची ठरू शकते हे लक्षात घ्या. आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडू देऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अन्य वरिष्ठ अधिकारी, सीआयआयचे पश्चिम विभागाचे चेअरमन त्यागराजन, महाराष्ट्र चेअरमन सुधीर मुतालिक आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com