महाविकास आघाडी सरकारने बालिश आरोप बंद करावेत - चंद्रकांत पाटील

करोना संकटाकडे लक्ष द्या
महाविकास आघाडी सरकारने बालिश आरोप बंद करावेत - चंद्रकांत पाटील

पुणे -

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्रावर बालिश आरोप करणे बंद करावे आणि करोनाच्या संकटाकडे लक्ष द्यावे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे असेही ते म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकण्यास सोळा कंपन्यांना मनाई केली, असा खोटा आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. केंद्रावर आरोप केला असताना त्यांनी गुजरात सरकारचा आदेश दाखविला.

एखाद्या कंपनीने रेमडेसिवीर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते. महाराष्ट्र सरकारनेही असाच आदेश दिला आहे. असे असताना नवाब मलिक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपाची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दखल घेतली आणि माहिती देण्याची विनंती केली. नवाब मलिक यांनी माहिती दिलेली नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार आरोप करा आणि पळून जा, असा प्रकार चालू आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी असेही पाटील म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com