पुणे (प्रतिनिधी) -

समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार

जाहीर करावा असा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या जोडप्यास भारत रत्न घोषित करण्याचा केंद्र सरकारला आग्रह करण्याचा ठराव काँग्रेसचे नेते उल्हास बागुल यांनी सर्वसाधारण सभेत मांडला आणि सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने एकमताने तो मंजूर करण्यात आला. हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल.

आबा बागुल म्हणाले, समाज सुधारक ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली नागरी संस्था आहे. आतापर्यंत, पुणे शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महर्षि धोंडो केशव कर्वे आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याशी पुण्यातील नागरिकांचा भावनिक संबंध आहे. त्यांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. महानगरपालिकेने नागरी मुख्यालयाच्या आवारात ज्योतिराव फुले यांचे स्मारकही बांधले असून देशभरात विविध ठिकाणी या जोडप्यांची स्मारकं बांधली गेली आहेत.

सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती सुरू झाली आहे पण त्यांना भारतरत्न देण्यात आलेला नाही. “महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आता हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो राज्य सरकारकडे पाठविले जाईल जेणेकरून ते केंद्र सरकारला याची शिफारस करु शकतील. ” असे बागुल म्हणाले.