महाराष्ट्राला शिवरायांचे 'वाघ नखं' इंग्लंडकडून फक्त ३ वर्षांसाठी मिळणार, तीसुद्धा कर्जावर?

महाराष्ट्राला शिवरायांचे 'वाघ नखं' इंग्लंडकडून फक्त ३ वर्षांसाठी मिळणार, तीसुद्धा कर्जावर?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या वाघनखांसंदर्भात नवीन माहिती समोर आली असून ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं कर्जावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरचा सरदार अफझलखान याचा ज्या वाघनखांनी कोथळा काढला होता, ती ऐतिहासिक वाघनखे सध्या ब्रिटनच्या 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट' या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. ही वाघनखं नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानात आणली जाणार आहेत. या वाघनखांच्या वाहतूक आणि सुरक्षेसाठी 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

मायदेशी आल्यानंतर एकूण चार मुख्य संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत. यात मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, नागपूर येथील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूर येथील लक्ष्मी विलास पॅलेस यांचा समावेश आहे. मात्र, ही वाघनख फक्त तीनच वर्षासाठी हिंदुस्थानात असणार आहेत. तसा स्पष्ट उल्लेख ब्रिटनसोबत झालेल्या करारात करण्यात आला आहे. त्यानंतर ती पुन्हा ब्रिटन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला परत देण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com