राज्यात 'या' ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी
राज्यात 'या' ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चाही इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १५ मे पर्यंत त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन १८ मेच्या संध्याकाळपर्यंत त्याचा गुजरात किनारपट्टीवर लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रासाठी इशाऱ्याची तीव्रता वाढली आहे. १६ आणि १७ मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येही सोमवारी दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच, महाराष्ट्रात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी 'ऑरेंज अलर्ट' हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज (१४ मे) देखील वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान मान्सूनला सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी असताना राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण बनून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील तापमानात चढउतार होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com