महाराष्ट्रात डिसेंबरपुर्वी राष्ट्रपती राजवट

प्रकाश आंबेडकरांचे भाकित
महाराष्ट्रात डिसेंबरपुर्वी राष्ट्रपती राजवट

मुंबई -

महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्यापुर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे

भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. तर विविध मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत खळबळ उडवून देणारे विधान केले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली जाईल त्यांचेही कारण त्यांनी सांगितले आहे. केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, असे आंबेडकर यांनी सांगितले.केंद्र सरकारने घेतलेले निर्णय राज्य सरकारकडून वारंवार धुडकावले जात आहेत. केंद्राने नुकताच कृषी कायदा मंजूर केला मात्र याची अंमलबजावणी करण्याचा कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. यासाठी विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या हिताचे असेल तरच हा कायदा लागू करू अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा या कृषी कायद्यांना ठाम विरोध आहे. यामुद्यांकडे आंबेडकर यांनी लक्ष लेधले.

ठाकरे सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेत असून, राज्य सरकार केंद्राचे कायदे धुडकावून लावत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्राने अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामध्ये केंद्राने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. मुंबईतील लोकल आजही बंद आहे. या मुद्द्याचा आधार घेत आंबेडकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली.

एमपीएससी परीक्षा : सरकारने एका जातीचा विचार केला

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. एमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारनं एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केला आहे.

मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणार्‍यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारनं विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचं सरकार अतिरेक करत आहे.

सरकार वारकर्‍यांना धडा शिकवणार

वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकर्‍यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. सरकार निष्फळ ठरलं आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करत आहे. शेतकरी कृषी कायद्यांमुळे शेतकर्‍याला काहीही फायदा मिळणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com