मुंबई -

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी (28 डिसेंबर) केला.

तर हा आरोप खोडून काढताना भाजप नेते आशीष शेलार यांनी शिवसेनेवर दमबाजीचा आरोप केला. अशा दमबाजीला भाजप घाबरणार नाही, असे शेलार यांनी ठणकावून सांगितले.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने गृह कर्जप्रकरणी नोटीस पाठवून 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. या नोटीसवरून आज शिवसेना आणि भाजपमध्ये ईडी वॉर पेटले. पत्नीने 10 वर्षांपूर्वी घेतलेल्या गृह कर्जाची ईडीला आताच आठवण का आली? असा सवाल राऊत यांनी यावेळी केला.

राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या इशार्यावरुन ईडीने नोटीस बजावल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. गेले वर्षभर भाजपचे नेते आणि त्यांचे हस्तक आपल्याला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मोहात पडू नका, हे सरकार टिकवून देऊ नका,असे सांगत आहेत. एका नेत्याने आम्ही सरकार पाडायचे ठरवले असून त्यासाठी सारी यंत्रणा कामाला लावल्याचे सांगितले. या नेत्याने मला 22 आमदारांची यादी दाखवली. या आमदारांना ईडीच्या माध्यमातून ताब्यात घेऊन त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जाईल. प्रताप सरनाईक यांच्यावर सुरू असलेली कारवाई ही टोकन आहे, असे भाजपच्या नेत्याने सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला.

राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकंच नाही तर सरकार टिकू देऊ नका असं सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा दावा राऊत यांनी केला.

एचडीआयएलच्या एका प्रकल्पात भाजप नेत्याची भागीदारी आहे. या नेत्याला नोटीस बजावण्याची हिंमत ईडी करेल काय? असा सवाल करताना राऊत यांनी बायकांच्या पदराआड लपून खेळी करणे थांबवा. मला तोंड उघडायला लावू नका. भाजपच्या नेत्यांची संपत्ती 1600 पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात, असे राऊत म्हणाले.

जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरु आहे. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचे केलेले नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

राऊत यांनी दमबाजी करू नये : शेलार

दरम्यान, संजय राऊत यांच्या टिकेवर भाजपनेही जोरदार पलटवार केला. ईडीच्या नोटीसमुळे राऊत हादरले आहेत. दीड दमडीचा हिशोब देऊन त्यांनी स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही तर डर कशाला. डराव डराव करण्यापेक्षा हिशोब द्यावा, असा सल्ला भाजप नेते आशीष शेलार यांनी दिला. तसेच राऊत यांनी दमबाजी करु नये. भाजप अशा दमबाजीला घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपवर आरोप करू नका : भातखळकर

संजय राऊत यांनी आज वैफल्यग्रस्ततेने अनेक सवंग पद्धतीची विधाने केली. मी तोंड उघडले तर केंद्र सरकारला हादरे बसतील वगैरे. पण तुमचे तोंड कुणी दाबले आहे? जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपवर आरोप करण्याचे उद्योग बंद करा, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली.

सुडापोटी ईडीचा वापर : मलिक

भाजप आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका घेणार्यांच्या विरोधात ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ईडीने राज्यातील बर्याच नेत्यांना नोटीस बजावली. अशी नोटीस बजावणार असल्याची बातमी बाहेर येते. त्यानंतर ज्यांची चौकशी झाली त्याचे पुढे काय झाले हे अजून माहीत नाही. त्यामुळे भीती निर्माण करण्यासाठी ईडीचा उपयोग होत असल्याचे मलिक म्हणाले.