यूपीए नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये - अशोक चव्हाण

शिवसेनेशी काँग्रेसची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच
यूपीए नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये - अशोक चव्हाण

मुंबई -

शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे योग्य नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचे

खा. संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. शिवसेनेशी काँग्रेसची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या अटीवर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे असेही ते म्हणाले.

केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत.

पवार यांच्याविषयी काही बोलणे मला योग्य वाटत नाही. आपण यूपीएचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच इन्कार केलेला आहे. यूपीएचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलेले आहे, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.

शिवसेना ही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे जो पक्ष यूपीएमध्ये नाही, त्या पक्षाने यूपीएचे नेतृत्व कोणी करावे याचा सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशभरातील यूपीएमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांनी यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे असे एकमताने मान्य केलेले आहे.

सोनिया गांधी ह्या यूपीएचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबद्दल दुसर्‍या पर्यायाचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com