राज्यात रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून होणार सुरू

शाळा बंदच
राज्यात रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून होणार सुरू

मुंबई -

येत्या 5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार पुन्हा सुरू होणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत

रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यानं राज्य सरकारनं काही निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी होत होती. त्यासंदर्भात राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातलं आहे.

मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणार्‍या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणार्‍या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन व कोविड मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनं मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआर विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

शाळा बंदच - दरम्यान, राज्यात शाळा आणि कॉलेजेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असून ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com