राज्यात साडेसात लाख मुलांची गळती

शिक्षण हक्क कायद्यानंतरही गळती थांबेना
राज्यात साडेसात लाख मुलांची गळती

संगमनेर (वार्ताहर) / sangamner - देशात शिक्षण हक्क कायदा (Right To Education (RTE) Act) अस्तित्वात आल्यानंतर विद्यार्थ्यांची गळती थांबेल अशी अपेक्षा असताना देखील सात लाख 36 हजार विद्यार्थ्यांची गळती झाली असल्याची माहिती समोर आली आहे. करोनाच्या अगोदर राज्यातील ही अवस्था आहे. त्यामुळे करोनाच्या काळात ही संख्या अधिक वाढली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या गळतीत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वांधिक आहे हे विशेष. ही माहिती भारत सरकारच्या युडायस प्लसच्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे.

राज्यात सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावीच्या वर्गासाठी 1 कोटी 96 लाख 84 हजार 675 विद्यार्थी दाखल होते.तर 2018-19 मध्ये 1 कोटी 89 लाख 47 हजार 802 विद्यार्थी पटावरती दिसत आहे. याचा अर्थ त्या एका वर्षात 7 लाख 36 हजार 873 विद्यार्थ्यांची गळती झाली आहे. दरम्यान 2020 च्या मार्चपासून शाळा बंद झाल्या आहेत त्यानंतर या संख्येत वाढ झाली असावी असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्थगिती आणि गळती थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. कायद्याने सहा ते चौदा वयोगटातील एकही मुले शाळेच्या बाहेर असणार नाहीत, प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या आठ वर्षात गळतीवर आपण मात करू शकलो नाहीत हे दुर्दैव असल्याचे मानले जाते.

सर्वाधिक गळती माध्यमिक स्तरावर

राज्यात एकूण गळती झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच लाख 1 हजार 416 विद्यार्थ्यांची गळती केवळ नववी आणि दहावीच्या टप्प्यावरती झाली आहे. उच्च प्राथमिक स्तरावरती एक लाख 26 हजार 990 विद्यार्थ्यांची गळती झाली आहे. तर प्राथमिक स्तरावरती एक लाख 8 हजार 467 विद्यार्थी शाळाबाहय झाली आहेत. राज्यातील 68 टक्के विद्यार्थी ही माध्यमिक स्तरावरती गळती झाली आहे हे विशेष. तर प्राथमिक स्तरावरती पंधरा टक्के विद्यार्थी शाळाबाहय झाली आहेत हे ही लक्षात घ्यायला हवी. राज्यात माध्यमिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात आले आहे. तेथील गळती चिंताजनक आहे.

सर्वाधिक गळती इतर मागास प्रवर्गातील

राज्यात झालेल्या एकूण 7 लाख 36 हजार 873 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 37 हजार 171 विद्यार्थी इतर मागास प्रवर्गातील आहे. एकूण गळतीपैकी सुमारे 46 टक्के विद्यार्थी या संवर्गातील आहे. तर 1 लाख 73 हजार 374 विद्यार्थी ही सर्वसाधारण प्रवर्गातील आहे. अनुसूचित जमातीची एक लाख 29 हजार 372 विद्यार्थी असून अनुसूचित जातीतील 96 हजार 956 विद्यार्थ्यांची गळती आहे. एकूण गळतीचे टक्केवारी लक्षात घेता सामाजिक संवर्गातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी लक्षात घेता सर्वसाधारण संवर्गातील 2.11 टक्के, इतर मागास प्रवर्गातील 5.08 टक्के, अनु.जाती 3.76 टक्के, अनु.जमाती 5.72 विद्यार्थी शाळेच्या प्रवाहाबाहेर गेली आहेत.

माध्यमिकमध्ये जमातीच्या 22 टक्के विद्यार्थ्यांची गळती-

राज्यात माध्यमिक स्तरावरती 22.83 टक्के अनु.जमातीचे विद्यार्थी शाळाबाह्य आहेत.त्याखालोखाल जातीचे विद्यार्थी 15.13 टक्के, 13.75 टक्के इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत. या टप्प्यावरती 13.29 टक्के गळती आहे. त्यानंतर उच्च प्राथमिक स्तरावरती 4.82 टक्के जमातीच्या विद्यार्थ्यांची गळती झाली आहे.प्राथमिक स्तरावरती 2.58 टक्के विद्यार्थी इतर मागास प्रवर्गातील आहेत. प्राथमिक स्तरावर एकूण गळती 1.08 टक्के तर उच्च प्राथमिक स्तरावरती 2.15 टक्के इतकी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com