
पुणे | Pune
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील चर्चेचा विषय म्हणजे सिकंदर शेख. सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी विजेत्यापेक्षा जास्त चर्चा सिकंदरच्या पराभवाची सुरु आहे. सिकंदरला न्याय दिला गेला नाही, असे आक्षेप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर नोंदवले गेले आहेत. पैलवान महेंद्र गायकवाडने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. तो परफेक्ट नव्हता असं काहींचं म्हणणे असून त्यावरून वाद सुरू झाला आहे.
सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जातोय. खुद्द सिकंदरच्या आई वडिलांनीही आपल्या लेकराला न्याय दिला नसल्याची खंत बोलून दाखवली आहे. याच दरम्यान महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सिकंदर शेख (Sikandar Shaikh) विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरुन धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारुती सातव आणि संग्राम कांबळे यांचे फोन रेकॉर्डिग देखील व्हायरल झाले आहेत. संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांची फोनवरुन अक्षरश: झापलं आहे.
कांबळे यांच्या धमकीनंतर पंच सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या तक्रारीचा अर्ज महाराष्ट्र केसरी स्पर्धा समितीच्या वतीने संदीप भोंडवे यांनी देखील कोथरूड पोलिसांकडे दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार?
नुकताच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेच्या सेमीफायनलचा सामना माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. सामन्यांत वरचढ दिसणाऱ्या सिकंदर शेख याच्याविरोधात महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत ४ गुण मिळवत ५-४ अशी आघाडी घेतली. त्यामुळे सेमीफायनल सामन्यांत सिकंदर शेख याचा पराभव झाला.