मुंबई l Mumbai

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

रिहानाने आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं.

पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी सरकारच्या पाठिंब्यात ट्वीट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना समर्थन पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यावर सरकाराने याला विदेशी दुष्प्रचार म्हणत निंदा केली. यानंतर काही भारतीय सेलिब्रिटींनी सुरात सूर मिसळत ट्विट केले होते. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, विराट कोहली, सायना नेहवाल यांचा समावेश होता.

दरम्यान, शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी याबद्दल बोलताना सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणाला इतकं महत्त्व देण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली आहे. सेलिब्रिटींनी जशी ही केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्वीटची मालिका सुरू केली तशी नेटकर्यांनी तात्काळ त्यांच्या ट्रोलिंगला देखील सुरूवात केली होती. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत बोलताना मोदी सरकारने किमान भारतरत्नांच्या सन्मानाचा विचार करायला हवा होता. यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचं बोलत मोदी सरकारचा निषेध केला होता.