आरोग्य विभाग भरती : तोपर्यंत ‘या’ पदांचा निकाल नाही

51 संवर्गातील पदाचे निकाल घोषित करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल पण...
आरोग्य विभाग भरती : तोपर्यंत ‘या’ पदांचा निकाल नाही

मुंबई -

राज्याच्या आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात

आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदाचे निकाल घोषित करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल पण आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषित करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना टोपे बोलत होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड संवर्गाची पदे रिक्त आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पन्नास टक्के पदभरतीला परवानगी दिली आहे. या रिक्त पदांसाठी 28 फेब्रुवारीला 32 जिल्ह्यातील 829 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1 लाख 33 हजार उमेदवार होते. ही परीक्षा मेसर्स जिंजरवेब कंपनीमार्फत घेण्यात आली.

या परीक्षेदरम्यान दोन सेंटरमध्ये सोशल डिस्टसिंग पाळले नाही, प्रश्नपत्रिका उशिरा प्राप्त झाल्या, सेंटर वेळेत उघडले नाही, डमी उमेदवारांने परीक्षा दिली, उमेदवार मोबाईल फोन घेऊन आले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जेथे प्रश्नपत्रिका उशिराने पोहोचल्या तेथे वेळ वाढवून देण्यात आला. दोन ठिकाणी पोलीस तक्रार दाखल झाली. औरंगाबादमध्ये पोलीस छाप्यात आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचे काही प्रश्न एका अभ्यासिकेत आढळले त्याचा पोलीस तपास सुरु असून तोपर्यंत या दोन पदांचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे. भाईंदर येथे सुतार या पदाचे 15 उमेदवार परीक्षेसाठी गेले परंतु त्यांची प्रश्नपत्रिका नालासोपारा येथे गेली होती, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com