“सरकार इतकं असंवेदनशील आहे की...”; ठाकरे सरकारवर महिला आयोगाकडून टीका

“सरकार इतकं असंवेदनशील आहे की...”; ठाकरे सरकारवर महिला आयोगाकडून टीका

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेल. साकीनाक्यातील (Sakinaka Rape Case) महिलेवरील अत्याचार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आज राष्ट्रीय महिला आयोगाचं (National Women Commission) पथक साकीनाक्यात दाखल झालं. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी महिला आयोगाच्या पथकाने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

'ही दुर्देवी घटना आहे. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी निरंकुश आहेत. आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत,' असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.

'संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही की सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असतं तर महिलांना न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवं,' असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.

दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. “एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल कराव. जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी.”, असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com