
मुंबई | Mumbai
एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Employee DA Hike) आंनदाची बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ३४ टक्के असलेला महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर आता त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर राज्य सरकारवर ९ कोटींचा बोजा पडणार आहे.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपानंतर राज्य सरकराने त्यांच्या पगारामध्ये आणि महागाई भत्त्यात वाढ केली होती. यातच आता गणपती उत्सवाच्या तोंडावर पुन्हा महागाई भत्त्यात वाढ मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आंनदाचं वातावरण आहे.